राज्यात अद्यापही कायम असलेल्या कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारकडून दहीहंडीला (Dahihandi) परवानगी नाकारण्यात आली आहे. आज दुपारी गोविंद पथकांच्या समन्वय समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयानंतर भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी 'दहीहंडी साजरी करणारच' असं म्हटलं आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात आपली भूमिका व्यक्त केली.
राम कदम यांनी व्हिडिओत म्हटले की, "काही गोविंदा पथक महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदा तरी दहीहंडीचा उत्सव साजरा करता यावा, अशी सर्व गोविंदा पथकांची मागणी होती. यावर्षीची दहीहंडी महाराष्ट्राच्या हिंदूविरोधी सरकारने कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. दहीहंडी हा हिंदूंचा सण आहे. जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले आणि इतरांचे सण येतात तेव्हा त्यांना परवानगी. हा दुटप्पी न्याय कसा?"
राम कदम ट्विट:
#दहीहंडी होणारच.. घरात बसुन सबुरीचे आम्हाला नकोत.. #बार उघडता त्यांना नियम लावता आणी हिन्दू सणांना विरोध ? आम्ही दहीहंडी करणारच .. pic.twitter.com/x1YB2512p3
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) August 23, 2021
पुढे ते म्हणाले की, "बियर बार, दारुचे ठेके उघडताना त्यांना प्रोटोकॉल लावता. तसे नियम जर तुम्ही लावणार असला तर त्याचं आम्ही स्वागत करु, पालन करु, पण तुम्ही नियम लावणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असला दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाहीत. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच."
दरम्यान, जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिला आहे.