अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya sabha Election) आपला उमेदवार जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या 15 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. महायुतीमध्ये भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली. राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह 8-10 इच्छुक उमेदवार होते. (हेही वाचा - Rajyasabha Election: राज्यसभेसाठी भाजप चौथा उमेदवार देणार नाही; बावनकुळेंनी केलं जाहीर)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिली असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी महायुतीने त्यांच्या गणितानुसार सर्व 5 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपनं त्यांचे तीन उमेदवार जाहीर केले.
महाराष्ट्र विधानसभेचे 288 सदस्य आहेत, त्यापैकी शिवसेनेचे सांगलीतील आटपाडीचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा या दोन आमदारांचं निधन झालं आहे, तर अशोक चव्हाण यांचा राजीनामा आणि नागपूरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे 284 आमदार उरतात भागिले रिक्त जागांची संख्या 6 + 1 = 40.57 राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 40.57 इतका मतांचा कोटा असेल.