Rajya Sabha Election 2022: संजय राऊत चौथ्यांदा राज्यसभेवर, शिवसेनेकडून शिक्कामोर्तब; 26 मे रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाराष्ट्रातील राजकीय पक्ष उमेदवार निश्चितीच्या कामाला लागले आहेत. या निवडणुका जून महिन्यात पार पडणार आहेत. त्या दृष्टीने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने (Shiv Sena) आपला उमेदवार जाहीर केला आहे. राज्यसभेसाठी याही वेळी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने संजय राऊत (Sanjay Raut ) यांच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर निघाले आहेत. राज्यसभेसाठी संजय राऊत येत्या 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यसभेसाठी राज्यातील राजकीय पक्षांकडे असलेल्या संख्याबळाचा विचार करता, भाजप-दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर पाठवतील. आपला उमेदवार विजयी होईल इतके संख्याबळ या पक्षांकडे आहे. दरम्यान, खरी चुरस होणार आहे ती सहाव्या जागेसाठी. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आगोदरच दावा केला आहे. त्यामुळे पहिला उमेदवार म्हणून शिवसेनेने संजय राऊत यांच्या नावावर शिकामोर्तब केले आहे. दुसऱ्या नावासाठी मात्र शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या 13 जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा)

राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांची नावे

  • भाजप- पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे
  • शिवसेना- संजय राऊत
  • राष्ट्रवादी काँग्रेस- प्रफुल्ल पटेल
  • काँग्रेस- पी चिदंबरम

राज्यसभेतून वरील सहाही सदस्यांचा कार्यकाळ येत्या 4 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे हे खासदार निवृत्त होत आहेत. शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी चार माजी खासदारांच्या नावावर चर्चा सुरु असल्याचे समजते. यात चंद्रकांत खैरे, शिवाजी आढळराव पाटील, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ यांच्या नावाचा समावेश असल्याचे समजते. विशेष म्हणजे हे चारही जण मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे शिवसेना त्यांचे राज्यसभेवर पुनर्वसन करेन अशी आशा आहे.