Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credit - Social Media)

राज्यसभेतील रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या रिक्त जागांपैकी सहा जागा महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर आपापल्या जागा निवडून आणण्यासाठी राज्यातील राजकी पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने राज्याच्या वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अपक्ष उमेदवारीसाठी शिवसेना (Shiv Sena) आणि महाविकासआघाडी आणि सर्वपक्षीयांनीच पाठिंबा द्यावा अशी संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. दुसरी बैठक मात्र यांच्यात होऊ शकली नाही. दरम्यान, या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांना एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं, ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील'. संभाजीराजे छत्रपती यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात नेमके काय ठरले आहे याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढण्यावर ठाम? शिवसेनेची ऑफर नाकारल्याची चर्चा)

दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचाच उमेदवार असेल असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, शिवसेना जो उमेदवार देईल तो कट्टर शिवसैनिक असेल असे स्पष्ट करतानाच या उमेदवाराच्या नावाची घोषणा स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.