राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती (Rajarshi Shahu Maharaj Foreign Scholarship) योजनेचा लाभ घेऊन शिक्षणासाठी विदेशी विद्यापीठांत जाणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या घटकांतील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 06 लाख रुपायांच्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना विदेशात जाण्यासाठी लागणारे विमान प्रवासाचे भाडे आता आगाऊ (Advance) स्वरुपात दिले जाणार आहे. राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडून याबाबत आदेशही निर्गमित करण्यात आला आहे.
राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड होत असे त्या विद्यार्थ्यांना यापूर्वी आगोद स्वत:च्या खर्चाने प्रवास करावा लागत असे. त्यानंतर त्याला स्वतंत्र अर्ज करुन विमान प्रवासात खर्च झालेली रक्कम शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सरकारकेड मागावी लागत असे. विद्यार्थी विद्यापीठात प्रत्यक्ष हजर झाल्यानंतर आणि त्यांनी विमानाचे तिकीट व बोर्डिंग पास जमा केल्यावरच त्याला सरकारकडून योजनेंतर्गत विमान प्रवासाचे पैसे (भाडे) दिले जायचे. ही प्रक्रिया बरीच वेळखाऊ असल्याने ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसायची त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागायचे. त्यामुळे राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यार्थी आणि पालकांना दिलासा दिला आहे. (हेही वाचा: Bank of Baroda Recruitment 2022: बॅंक ऑफ बडोदा मध्ये 198 जागांवर नोकर भरतीचं नोटिफिकेशन जारी; इथे पहा bankofbaroda.in वर कधीपर्यंत करू शकाल अर्ज.)
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थी आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांच्या आतमध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांना विमान प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारे पैसे आता वेळेत मिळणार आहेत. आर्थिक दुर्बल असणाऱ्या घटकाला यामुळे मोठाच हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, हा लाभा पूर्व नियमांनुसारच मिळणार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.