![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/rajan-salvi.jpg?width=380&height=214)
'मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही' म्हणजार्या राजन साळवी (Rajan Salvi ) यांनी अखेर शिवबंधन तोडत आज 13 फेब्रुवारी दिवशी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आनंदाश्रमामध्ये राजन साळवी आणि त्यांच्या पदाधिकार्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचीही उपस्थिती होती. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशापूर्वी साळवी आणि सामंत बंधूंमध्ये समेट घडवत हा पक्ष प्रवेश झाला आहे.
राजन साळवी हे विधानसभेत 3 टर्म आमदार राहिले आहेत. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये किरण सामंत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान विधानसभा निवडणूकीतील पराभवामागे विनायक राऊत असल्याचा जाहीर उल्लेखही त्यांनी आज केला आहे. राऊत आणि काही पदाधिकार्यांमुळे आपला पराभव झाला आणि त्याचे पुरावे ही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा पक्ष प्रवेश करताना एका डोळ्यात अश्रू आणि दुसर्या डोळ्यात आनंदाश्रू असल्याचं म्हटलं आहे.
राजन साळवी यांना कुटुंबापासून एक भाऊ लांब राहिला होता आज एकनाथ शिंदे यांनी या भावाला पुन्हा जवळ केले आहे असे म्हणत शिवसेना पक्षप्रवेशावेळी आनंद व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजन साळवी यापूर्वीच आपल्यासोबत असायला हवा होता पण योगायोग आता जुळून आल्याचं म्हटलं आहे.
उदय सामंत यांनीही राजन साळवी यांचं शिवसेना पक्षामध्ये स्वागत केले आहे. पक्षाच्या हिताआड सामंत बंधू येणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.
किरण सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला
ठाण्यात राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश होण्यापूर्वी राजापूरचे विद्यमान आमदार किरण सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहचले होते.
राजन साळवी यांनी पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कालच राजन साळवींनी उबाठा गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्त केला आहे. नक्की वाचा: Rajan Salvi: मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार, माझी निष्ठा उद्धव ठाकरे यांच्या पायाशी, आमदर राजन साळवी यांच्याकडून बंडखोरीच्या चर्चेस पुर्णविराम.
महाराष्ट्रात राजन साळवींनी उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर आता दिल्ली मध्ये आदित्य ठाकरे उबाठा च्या खासदारांसोबत बैठक करायला पोहचले आहेत. काल काही खासदार एकनाथ शिंंदेंच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात दिसले. त्यानंतर सध्या 'ऑपरेशन टायगर' सुरू असल्याची चर्चा आहे.