
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे 20 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकरांसोबत एका पॉडकास्टवर बोलत असताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रहितासाठी मी 'इगो बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो.' असं विधान केलं आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनीही तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता ठाकरे बंधूंची युती होणार का? याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर आज संजय राऊतांनी विधान करत यामध्ये कोणत्याही अटीशर्थींचा प्रश्न नसल्याचं म्हटलं आहे. पण सध्या युतीची नव्हे तर भावनिक संवादापर्यंतच हा विषय असल्याचं स्पष्ट केलं आहे. Raj Thackeray And Uddhav Thackeray Together: दादरमध्ये नातेवाईकाच्या लग्नात एकत्र दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे; एकमेकांशी केल्या कानगोष्टी, पहा व्हिडिओ .
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये उबाठा शिवसेना आणि मनसे यांना अपेक्षित यश मिळू न शकल्याने आता तरी या दोघांनी एकत्र येण्याचा विचार करावा अशी जनभावना समोर येत असताना आगामी महानगरपालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर या दोन्ही भावंडं आणि महाराष्ट्रातील 2 प्रमुख नेत्यांच्या मनोमिलनाच्या गोष्टींनी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. नक्की वाचा: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? पहा दोन्ही ठाकरेंची भूमिका काय.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे परिवारातील भाऊ आहेत. दोन पक्ष प्रमुख आहेत. त्यांच्यामध्ये अजूनही नातं टिकून आहे. आमच्यामध्ये मैत्रीचा धागा आहे. त्यामुळे आता लगेजच युतीची चर्चा झालेली नाही पण सध्या भावनिक स्तरावर दोघांकडूनही विधान झालं आहे. तसेच महाराष्ट्र हितासमोर दोघेही एकत्र येणार असतील तर त्यामध्ये अटी शर्थींचा प्रश्न येतोच कुठे? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
राज ठाकरे यांनी का सोडली होती शिवसेनेची साथ?
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हे माझे विठठल आहेत. मी माझ्या विठ्ठलाभोवती असलेल्या बडव्यांना कंटाळून पक्ष सोडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 2006 साली त्यांनी शिवसेनेमध्ये आपल्याला आणि आपल्या साथीदारांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचं सांगत त्यांनी शिवसेना पक्ष सोडला आणि स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला.
दरम्यान राज ठाकरे यांनी मागील 19 वर्षात मनसे पक्ष म्हणून अनेक चढ उतार पाहिले. पण निवडणूकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत अद्याप कधीही युती-आघाडी केलेली नाही. मागील लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता.