Raj Thackeray and Uddhav Thackeray | File Image

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा बदलाचे वारे वाहणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांनंतर राज ठाकरे (Raj Thackeray)-उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता तरी एकत्र यावं अशी चर्चा सुरू झाली होती. निवडणूकांच्या तोंडावर अनेकदा ही चर्चा रंगते. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले आहेत. पण हे गणित जुळून आलं नव्हतं. पण आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा ही चर्चा रंगत आहे. राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांच्या 'वास्तव मै ट्रुथ' पॉडकास्ट मध्ये महाराष्ट्र हितासमोर आमच्यातील वाद हे फारच क्षुल्लक कारण असल्याचं सांगत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावर उबाठा गटाकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया आल्याने आता खरंच उद्धव ठाकरे- राज ठाकरे एकत्र येणार का? याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. पहा आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी आपण बाळासाहेब ठाकरेंशिवाय अन्य कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पण उद्धव ठाकरेंसोबत पूर्वीही मला काम करायला हरकत नव्हती. पण त्यानंतर शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर आमच्या साठी हा निर्णय केवळ राजकारणापुरता नव्हता तर कौटुंबिकही होता. पण आता महाराष्ट्राचं हित माझ्यासाठी प्राधान्य आहे आणि त्यासमोर आमच्यातील वाद ही अत्यंत क्षुल्लक बाब आहे. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनीही लगेजच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र हितासमोर मी देखील सारी भांडणं विसरायला तयार आहे. पण छत्रपतींची शपथ घेऊन त्यांनीही महाराष्ट्राच्या मूळावर उठणार्‍यांना कोणतीही मदत करणार नसाल तर आमच्यासोबत येण्याची तयारी दाखवा असं उद्धव ठाकरे सभेत बोलताना म्हणाले आहेत. 'महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मिटवली.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अट टाकली आहे. Raj Thackeray And Uddhav Thackeray Together: दादरमध्ये नातेवाईकाच्या लग्नात एकत्र दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे; एकमेकांशी केल्या कानगोष्टी, पहा व्हिडिओ .

दरम्यान संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बंधुत्त्वाचं, मैत्रीचं नात आहे. आता पुरता राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची भाषा केली त्याकडे आम्ही सकारत्मकतेने बघत आहोत. सध्या पुरता इतकंच आहे असं ते म्हणाले आहेत.