'महाराष्ट्रात चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न कराल, तर बांबू बसल्याशिवाय राहणार नाही'- राज ठाकरे
Raj thackeray (Photo Credit: IANS)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरें ( Raj Thackeray) यांनी पु्न्हा सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. राज ठाकरें नेहमी त्यांच्या भाषणातून मराठी भाषेचा प्रचार करताना आपल्याला दिसतात. परंतु, नुकतीच भांडूप (Bhandup) येथे पार पडलेल्या सभेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात चौथी भाषा (fourth language in maharashtra) आणण्याचा प्रयत्न कराल तर, बांबु बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. गेल्या ५ वर्षात बेरोजगारी वाढली, उद्योगधंदेही बंद पडले आहेत, असे बोलून राज ठाकरे यांनी भाजप सरकारवरही टिका केली आहे. याच सरकारला जाब विचारण्यासाठी मनसेला विधानसभेत प्रबळ विरोध पक्ष बनवायचे आहे. त्यासाठी मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे यांची शुक्रवारी भांडूप येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात प्रचारसभा घेउन काश्‍मिरातील 370 कलम रद्द केल्याची भाषणे करत आहेत. पण शेतकरी आत्महत्याबाबत त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही. त्यांची सभा सुरू असतानाच त्याच्या बाजूच्या गावातच शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. भाजपा असेल, शिवसेना असेल निवडणुका आल्या की फक्त जाहीरनामे काढून, लोकांच्या तोंडावर फेकतात. सत्ता मिळाली की पाच वर्षे पुन्हा ते सर्व विसरून जातात, असे सांगताना भाजपा-शिवसेनेने पाच वर्षांपुर्वी जाहीरनाम्यात काय वचने दिली होती, याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखविली आहे. हे देखील वाचा-Maharashtra Assembly Election 2019: 'या' कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरावा लागणार 10 हजार रुपयांचा दंड.

दरम्यान राज ठाकरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता यांच्यावर जोरदार टिका केली आहे. ज्यांच्याकडे सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्याची जबाबदारी होती, तेच भाजपमध्ये गेले आहेत. यासाठी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेना हा सक्षम पक्ष आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.