व्यंगचित्रातून अनेक नेते, सरकारवर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचे नवे चित्र समोर आले आहे. या चित्रातून त्यांनी महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर भाष्य केले आहे. आजारी साखर कारखाने आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या राज्य सरकारवर राज यांनी व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने नोव्हेंबर महिन्यातच महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. अशावेळी तहानलेल्या महाराष्ट्राला मदत करण्याऐवजी सरकार आजारी साखर कारखान्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करत असल्याने राज यांनी फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
व्यंगचित्रात राज यांनी एक तहानलेला मरणाला टेकलेला एक व्यक्ती सरकारकडे पाण्याची विनंती करत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्याच्यावर ओरडून त्याला कोपऱ्यात बसण्यास सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांना 'संवेदनशील सरकार' अशी उपमा दिली आहे. तर साखर कारखान्यांना 'भष्ट्राचाराने आजारी पडलेले साखर कारखाने' म्हटले आहे.
#DroughtInMaharashtra #Corruption #SugarFactories #DevendraFadanvis #BJPShivsenaAllianceGovernment pic.twitter.com/JdKtgQ1xwJ
— Raj Thackeray (@RajThackeray) November 18, 2018
आजारी साखर कारखाने म्हणून एक जाडजूड व्यक्ती दाखवण्यात आली आहे तर त्याच्यासमोर नोटांचे ढिगारे दिसत आहेत. ती व्यक्ती एकटक त्या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहत आहे. 'महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना येथील आजारी साखर कारखान्यांना 550 कोटी रुपयांची मदत करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे! – बातमी’, असा उल्लेख व्यंगचित्रात करण्यात आला आहे.