महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर (Raj Thackeray Pune Visit) आहेत. त्यांचा पुणे दोरा आजपासून सुरु होत आहे. हा दौरा दोन दिवस चालणार आहे. सकाळी सव्वा दहा वाजणेच्या सुमारास राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा ताफा शिवतीर्थावरुन पुण्याच्या दिशेने निघाला. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका आहेत. त्यातच पुणे मनसेतही मोठ्या प्रमाणावर धुसफुस पाहायाला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्याती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी संवाद साधणार आहेत. राज यांच्या भेटीनंतर तर पदाधिकाऱ्यांमधील धुसफुस कमी होणार का? याकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांचा 5 जून रोजी अयोध्या दौरा जाहीर झाला आहे. त्या दृष्टीने मनसेने तयारीही सुरु केली आहे. असे असतानाच पुणे मनसेमध्ये मठ्या प्रमाणावर नाराजीनाट्य पाहायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असल्याची चर्चा सुरु आहे. या दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचीही शक्यता आहे. (हेही वाचा, Raj Thackeray on Ketki Chitale Post: कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये; केतकी चितळेच्या पोस्टचा राज ठाकरे यांच्याकडून निषेध)
राज ठाकरे अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेण्याची शक्यता आहे. मनसेने राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुणे पोलिसांकडे परवानगीही मागितल्याचे वृतत आहे. त्यामुळे राज ठाकरे या दौऱ्यात आगामी सभेबाबतही पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या सभेला मागितलेल्या परवानगीवर पोलिसांनी अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र ही सभा मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी होईल अशी चर्चा आहे.
पाठिमागील काही दिवसांपासून पुणे मनसे जोरदार चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या व्यासपिठावरुन मशिदींवरील भोंग्यांवरुन भूमिका घेतली. त्यानंतर पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर पुण्यात मजबूत असलेल्या मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस पाहायला मिळू लागली. त्यामुळे हे नाराजीनाट्य दूर करण्यासाठी राज ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता आहे.