Raj Thackeray on Ketki Chitale Post: कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये; केतकी चितळेच्या पोस्टचा राज ठाकरे यांच्याकडून निषेध
राज ठाकरे यांनी ट्विट करून 'कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा,' असं म्हणत या प्रकाराचा निषेध केला आहे. यासंदर्भात मनसेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
Raj Thackeray on Ketki Chitale Post: अभिनेत्री केतके चितळे (Ketki Chitale) ने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेचा मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून 'कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा,' असं म्हणत या प्रकाराचा निषेध केला आहे. यासंदर्भात मनसेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
या पत्रकात म्हटलं आहे की, कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. (हेही वाचा - Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे हिच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल, शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्ट भोवली)
महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत...! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील. परंतु, अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.
चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!
कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा! pic.twitter.com/hnngbIwQaW
— Raj Thackeray (@RajThackeray) May 14, 2022
पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2022 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

