महाराष्ट्र नवानिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वर्धापन दिनाचं औचित्य साधत मनसे (MNS) कडून खास तयारी सुरू आहे. आगामी पालिका निवडणूका आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष यावर राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलणार याकडे महाराष्ट्रातील जनतेसह मनसेच्या कार्यकर्त्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी खाजगी मुलाखती मध्ये बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल करून ठेवला असल्याची प्रतिक्रिया देताना त्यांनी यावर 9 मार्चला सविस्तर बोलणार असल्याचे संकेत दिले आहे.
राज ठाकरे मागील काही महिन्यांपासून पुन्हा पक्ष बांधणीच्या कामात स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका आणि अन्य प्रमुख शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मनसे काय करणार याची उत्सुकता वाढली आहे.
संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये मनसेच्या नव्या स्फुर्तीगीताची झलक ऐकायला मिळत आहे. “नवनिर्माण घडवूया” हे नवं गाणं देखील याच मुहूर्तावर लॉन्च केले जाणार आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील हे गाणं आगामी दिवसात घुमणार आहे.
प्रतीक्षा नऊ मार्चची pic.twitter.com/FDN5nSgtIm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 1, 2023
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणूकांमध्ये त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. आता पुन्हा नव्या जोशात ते निवडणूकीच्या रिंगणात उतरायला सज्ज आहेत.