Maratha Reservation: जालना येथे पोलिसांनी मराठा आरक्षण (Maratha Protest) मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर केलेल्या लाठीमारामुळे राज्यभारात संतापाची लाट आहे. खास करुन सर्वच राजकीय पक्षातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटलं आहे की, मी खात्रीने सांगतो. या आंदोलकांनी कोणतेच पाऊल चुकीचे टाकले नसेल. सरकारचंच खरं चुकले. जे घडले ते चूकच आहे. त्याचा निषेधच. पण राज्यात विस्कटलेली राजकीय स्थिती या घटनेला अधिक जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
''काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे''. (हेही वाचा, Maratha Reservation: आंदोलकांवर लाठीमार प्रकरणी संभाजीराजे,उदयनराजे आक्रमक; सरकारला इशारा)
राज ठाकरे यांनी पुढे असेही म्हटले आहे की, ''माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील'.
ट्विट
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो.
ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 2, 2023
दरम्यान, संभाजी राजे छत्रपती यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आंदोलांच्या भेटीसाठी जालन्याला निघाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. शिवसेना (UBT) मुखपत्र दैनिक सामनातूनही या लाठीमाराचा निषेध करण्यात आला आहे.