राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष (MNS) भारतीय जनता पार्टी यांच्यात युती (MNS-BJP Alliance) होणार का? या पाठिमागील अनेक दिवसांपासून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर उद्या मिळण्याची शक्यता आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा (Gudi Padwa Melava 2024) उद्या मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मेळाव्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्यक्तव्य केले आहे. ज्यामुळे मनसे-भाजप युतीच्या संभाव्य शक्यतांच्या चर्चांना अधिक उधान आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले?
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या जवळ जाणारी भूमिका घेतली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा विदर्भात पार पडत आहे. त्यामुळे राज्यातील हिंदुत्त्वाचे वातावरण ढवळून निघेल. अशा स्थितीत राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी आवश्यक भूमिका घेतील, अशी आपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सन 2014 ची पुनरावृत्ती?
राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका या आधीही घेतली आहे. त्यांच्या पक्षाने लोकसभा निवडणूक 2014 लढवली होती. या वेळी आपले उमेदवार निवडून येतील आणि आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देतील, अशी भूमिकच मनसे अध्यक्षांनी व्यक्त केली होती. मात्र, भाजप नेते राजनाथ सिंह यांनी अशापद्धतीने कोणाचा पाठिंबा घेण्यापेक्षा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पक्षाला मतदान करण्याचे अवाहन मतदारांना केले होते. त्यामुळे या वेळी राज ठाकरे काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यन, लोकसभा निवडणूक 2029 मध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या थेट विरोधात भूमिका घेतली होती. लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात भाजपला जेरीस आणले होते. त्या वेळी राज ठाकरे यांच्या भाषणांची आणि भूमिकेची देशभरात चर्चा सुरु होती. असे असले तरी राज ठाकरे यांनी वातावरण निर्मिती निश्चितच केली होती. मात्र, निवडणुकीत त्यांचे उमेदवारच उभे नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांना लाखोंची गर्दी होऊनही मतदारांना राज ठाकरे यांच्या पक्षाला मत देता आले नव्हते. आताच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.