राज ठाकरे (Photo Credit : PTI)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिकडे आपल्या कलेला आपले शस्त्र केले आहे. आपल्या व्यंगचित्रातून ते अनेक राजकर्त्यांवर फटकारे मारत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे वर्गाबाहेरचे विद्यार्थी असल्याचा टोला राज ठाकरेंनी चित्रातून लगावला आहे.

तर कसं आहे राज ठाकरेंचं व्यंगचित्र?

व्यंगचित्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापुढे व्यवस्थाच लीन झाल्याचं राज ठाकरेंनी दाखवलं आहे. त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत एक स्वयंसेवक संवाद साधत असल्याचेही चित्रात पाहायला मिळते.

यात सरसंघचालक मोहन भागवत मोहन भागवत स्वयंसेवकाला सांगत आहेत की, ''आरएसएस ही एक लोकशाहीप्रधान संघटना आहे ! संघात कोणा एकाची मनमानी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विचारांचे आदानप्रदान, चर्चा केली जाते.''

त्यावेळी स्वयंसेवक मोहन भागवत यांना एक प्रश्न विचारतो. या प्रश्नातूनच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टोला मारला आहे. स्वयंसेवक "मोहनजी अगदी बरोबर सांगत आहात ! आपण म्हणताय तेच आजपर्यंत आम्हाला 'शिकवलं' गेलं. मग या दोघांना नाही का ते 'शिकवलं' गेलं?"

ही पहिलीच वेळ नाही

व्यंगचित्रातून मोदींवर टीका करण्याची राज ठाकरे यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी नरेंद्र मोदी स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक आहेत, असा टोला व्यंगचित्राद्वारे त्यांना लगावला होता.