Raj Thackeray (Photo Credits: Instagram)

नांदेड (Nanded) येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. सुनील इरावार (Sunil Iravar) असे आत्महत्या करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे. तसेच त्याच्याकडे नांदेडचे शहराध्यक्षपद देखील सोपवण्यात आले होते. सुनीलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहली होती. ज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. या घनटेनंतर राज ठाकरे भावूक झाले असून त्यांनी फेसबुकवर (Facebook) आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक विनंती करणारे पत्र पोस्ट केले आहे.

"संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचे नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचे नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जाते. सुनील ईरावर ह्या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिले आहे की 'साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणे ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा'. अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेले राजकारण तर आपल्याला बदलायचे आहे. म्हणूनच 9 मार्च 2006 ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेले निवडणुकीचे राजकारण बदलायचे आहे आणि म्हणूनच गेले 14 वर्ष आपण हा संघर्ष करत आहेत. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही" असे राज ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Nishikant Kamat Dies: दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट

राज ठाकरे यांची फेसबूक पोस्ट-

"मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा... त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मत आहेत... ह्या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे... असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचे राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचे नाही, यश जेंव्हा यायचे असेल तेव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल. सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झाले तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका", असेही राज ठाकरे पत्रातून म्हणाले आहेत.