राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे येथील सभेत जाहीर केलेल्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेसाठी मनसे जोरदार तयारी करत आहे. औरंगाबाद पोलीसांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे ही सभा होणार की नाही याबाबत अद्याप निश्चितता नाही. दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मात्र ट्विटरवरुन मनसेच्या या सभेचा एक टीझर (Raj Thackeray Aurangabad Rally Teaser) पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. एका बाजूला मनसेच्या सभेबाबत उत्सुकता असताना दुसऱ्या बाजूला मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेला अद्यापही परवानगी दिली नाही.
शिवाजी पार्क येथील मैदानावर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा चर्चेत राहिला. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत भूमिका घेतली होती. राज यांनी केलेल्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटले. मनसेवर चौफेर टीकास्त्र झाले. मनसेतही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. एकूणच गोंधळाचे वातावरण पाहून आठ दिवसांमध्ये मनसेने ठाणे येथे दुसऱ्या सभेचे आयोजन केले. या सभेला त्यांनी उत्तरसभा असे नावही दिले. (हेही वाचा, MNS Aurangabad Rally: मनसे 1 मे ला औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्यावर ठाम; व्यासपीठ उभारणीच्या कामाला सुरूवात)
ट्विट
चला संभाजीनगर pic.twitter.com/AE06KuFwb7
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 26, 2022
ठाणे येथील उत्तर सभेतच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांबाबत आणखी आक्रमक भूमिका घेतली. हीच भूमिका आणखी विस्ताराने मांडण्यासाठी आणि मनसेची पुढील वाटचाल ठरविण्यासाठी राज ठाकरे यांनी याच सभेत औरंगाबाद येथील सभेची घोषणा केली. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेची घोषणा करताच मनसे कार्यकर्तेही कामाला लागले. या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे सभेची परवानगी मागितली नाही. दरम्यान, पोलिसांनी अद्याप तरी मनसेच्या सभेला परवानगी दिली नाही. उलट 9 मे पर्यंत शहरात जमावबंदी लागू केलीआहे. त्यामुळे आता ही सभा होणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.
दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या सभेला मराठवाड्यातील विविध संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना, मौलांना आझाद विचार मंच, गब्बर ॲक्शन संघटना आणि ऑल इंडिया पँथर सेना या पाच संघटनांनी राज यांच्या सभेला तीव्र विरोध करत पोलिसांनी सभेस परवानगी देऊ नये असे म्हटले आहे.