Rainfall In Mumbai City : कुर्ला परिसरात पूरस्थिती, तेराशे नागरिकांचे स्थलांतर; NDRF जवानांकडून सावधगिरीचा उपाय
Rainfall in Mumbai City | (Photo Credit: ANI)

Rainfall in Mumbai City And Suburban: मुंबई शहरातील कुर्ला (kurla) परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी सवावधगिरीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (National Disaster Response Force) जवानांनी या परिसरातील सुमारे 1300 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. कोसळधार पावसामुळे मिठी नदी (Mithi River) पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे नदीकाठी असलेल्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्राप्त माहितीनुसार, कुर्ला विमानतळाच्या पश्चिमेस असलेल्या क्रांती नगर भागात पुन्हा पाणी साचले आहे. हा भाग पाण्याखाली गेला आहे. तसेच, पावसाची संततधार अशीच सुरु राहिली तर, कुर्ला परिसरात इतर भागातही पाणी साचण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.

दरम्यान, केवळ मुंबईच नव्हे तर, मुंबई उपनगरांमध्येही पावसाची संततधार सुरुच आहे. अधेरी, बोरिवली, मालाड, तसेच, कुर्ला, माटूंगा, ठाणे डोंबिवली अशा विविध ठिकाणी पाऊस कोसळतो आहे. नवी मुंबई परिसरातही पाऊस कोसळधार बरसत असून, ऐरोली, जुईनगर, वाशी, पनवेल, कामोठे, खारघर, नेरुळ परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती ध्यानात घेऊन एनडीआरएफ जवानांची दोन पथकं पनवेलमध्ये दाखल झाली आहेत. (हेही वाचा, मुंबई: संततधार पावसामुळे मध्य रेल्वे सेवा विस्कळीत, हिंदमाता, सायन परिसरात सखल भागात साचले पाणी)

एएनआय ट्विट

मुंबईची नस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे सेवेवरही पावसाचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, डाऊन दिशेला कल्याणच्या पुढे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने प्रवाशांना माहिती दिली जात आहे. ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा दरम्यानची वाहतूक सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.