Liquid Medical Oxygen: द्रव वैद्यकीय ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वेने आखले धोरण; महाराष्ट्र सरकारने केली होती विनंती
Oxygen Cylinders (Photo Credits: ANI)

Liquid Medical Oxygen: महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून रेल्वेने शुक्रवारी क्रायोजेनिक टँकरमध्ये (Cryogenic Tankers) द्रव वैद्यकीय ऑक्सिजन (Liquid Medical Oxygen) वाहतुकीचे धोरण तयार केले आहे. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. शुक्रवारी उशिरा जाहीर करण्यात आलेल्या धोरणानुसार, क्रायोजेनिक टँकर्स 'रोल ऑन-रोल ऑफ' (Roll on Roll off Scheme) सेवेमार्फत देशातील विविध ठिकाणी नेले जातील.

दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य सचिवांनी क्रायोजेनिक कंटेनरमधून वैद्यकीय ऑक्सिजन वाहतुकीसाठी विनंती केली होती. चाचणी घेतल्यानंतर प्राधिकरणाने क्रायोजेनिक कंटेनरमधून द्रव वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाहतुकीस मान्यता दिली आहे. (वाचा - Medical Oxygen Shortage: 'या' राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची सर्वाधिक कमतरता; वाहतुकीमध्ये का येत आहे अडथळा? जाणून घ्या)

या परिपत्रकात या सेवेसाठी आकारण्यात येणार्‍या शुल्काबाबतही माहिती देण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असून त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य मागितले आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना संक्रमण झालं आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

महाराष्ट्र सरकारने पैसे व वेळ वाचवण्यासाठी रेल्वेने ऑक्सिजन सिलिंडर्सच्या वाहतुकीस परवानगी देण्याची विनंती केंद्राकडे केली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.