
कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी सध्या मुंबई लोकल प्रवासाची परवानगी नसून देखील काही प्रवासी फेक आयडी कार्ड (Fake ID Cards) वापरुन प्रवास करत असल्याचे निर्दशनास आले आहे. अशा एकूण 2,018 प्रवाशांना मध्य रेल्वेने दणका दिला आहे. 31 मे पर्यंत त्यांच्याकडून एकूण 10.09 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
28 एप्रिल ते 31 मे या कालावधीत या प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर मध्य रेल्वेकडून कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे केवळ आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Mumbai Local Train Update: मुंबई लोकल सुरु होण्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी दिले 'हे' संकेत)
मध्य रेल्वेच्या स्टाफने एप्रिल आणि मे महिन्यात तिकीट चेकिंग ड्राईव्ह आयोजित केला होता. यात त्यांनी एकूण 1.50 लाख प्रवाशांकडून 9.50 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 1.50 लाखांपैकी 5400 प्रवाशांना मे महिन्यात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 3.33 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई उपनगरांमध्ये यातील 32000 प्रवाशी विनातिकीट प्रवास करत होते. त्यांच्याकडून एकूण 1.65 कोटी रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे.
दरम्यान, 17 एप्रिल ते 2 जून या कालावधीत तिकीट चेकिंग स्टाफच्या स्पेशल टीमने 1269 प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडलं आहे. त्यांच्याकडून एकूण 2.40 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकांना रेल्वे सुविधेचा चांगला अनुभव मिळावा आणि विना तिकीट करणाऱ्यांची संख्या कमी व्हावी, या उद्देशाने असे कॅम्पेन्स सेंट्रल रेल्वेकडून वेळोवेळी भरवण्यात येतात, अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी दिली. कोरोना काळात फक्त परवानगी असलेल्या व्यक्तींनी प्रवास करावा हे सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते, असेही ते म्हणाले.