Chhagan Bhujbal (Photo Credit: ANI)

निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarg Cyclone) रायगड जिल्ह्यातील (Raigad District) वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे बाधित कुटुंबांना दिवे लावण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून प्रतिकुटुंब 5 लिटरप्रमाणे मोफत केरोसिनचे (Kerosene) वाटप करण्यात येणार आहे. तसेच अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यांकडून मागणी आल्यानंतर त्यांनादेखील केरोसिनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा आणि मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रति कुटूंब मोफत केरोसिन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील 7 लाख 69 हजार 335 इतक्या शिधापत्रिकाधारकांना 5 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे. (हेही वाचा - Nisarga Cyclone Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला तातडीची मदत केली जाहीर)

रायगड जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूंब म्हणून निश्चित केलेल्या कुटुंबांनाचं केरोसिनचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. सरकारकडून मंजूर करण्यात आलेले विनाअनुदानित दराचे केरोसिन जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळ बाधित म्हणून निश्चित केलेल्या कुटूबांनाचं करण्यात येईल, याची दक्षता घेण्याच्या सुचनादेखील छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.