Rahul Shewale, Aaditya Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभेमध्ये रिया चक्रवर्तीला कॉल करणारी AU ही व्यक्ती कोण? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नावापर्यंत त्याची चर्चा पोहचल्यानंतर मागील काही दिवसांत या प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यामध्ये काही आरोप प्रत्यारोप झाले. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून काही नेत्यांनी बोलताना राहुल शेवाळे आणि त्यांचे काही महिलांसोबत असलेले विवाहबाह्य संबंध, अडचणीत आलेलं त्यांचं लग्न इतपर्यंत आरोप पोहचले. दरम्यान यावर एक पत्रकार परिषद घेऊन राहुल शेवाळे यांनी काही काही पुरावे सादर करत आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी 'उद्धव ठाकरेंनी लग्न वाचवले नाही तर आता संसार आणि राजकारणातून उठवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचं' म्हटलं आहे.

राहुल शेवाळे यांनी 'सध्या माझ्यावर जी महिला आरोप करत आहे तिला युवासेना प्रमुखांची फूस असल्याचा' गंभीर आरोप केला आहे. शिवसेना सोडल्यापासून अशाप्रकारचे आरोप करून चारित्र्यहनन करून राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये राहुल शेवाळेंनी दुबईस्थित या महिलेला एका मित्राच्या सल्ल्याने मदत केली होती. ती कोविड काळात भारतामध्ये अडकली असल्याने इतरांप्रमाणे तिलाही मदत केली. पण पुढेपुढे तिच्या मागण्या वाढत गेल्या असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Rahul Shewale on Aaditya Thackeray: 'एयू' म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे, या नावाने रिया चक्रवर्ती हिच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह प्रकरणात राहुल शेवाळे यांचा आरोप .

राहुल शेवाळे यांनी यावेळी महिलेला इंस्टाग्राम आणि ट्वीटर वर काही युवासेनेचे शाखाप्रमुख फॉलो करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात बसून युवासेनेच्या पदाधिकार्‍यांना दुबई स्थित महिलेशी इंस्टा कॉल करण्याची, तिला फॉलो करण्याची काय गरज असं म्हटलं आहे. दरम्यान ही महिला दाऊद गॅंगशी संबंधित असल्याचा दावा करत तिला पाठीशी घालण्याचं काम युवासेना करत असल्याने याप्रकरणी NIA कडून चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.

राहुल शेवाळेंसोबत पत्रकारपरिषदेमध्ये त्यांची पत्नी कामिनी शेवाळे आणि वकील देखील होत्या. या महिलेविरोधात अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात ठोकल्याचीही वकिलांनी माहिती दिली आहे.