Rahul Narwekar | PC: Twitter/ANI

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आजपासून विशेष विधिमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे.  विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कामकाजाला सुरुवात केली. आज पहिल्याच दिवशी नव्या सरकारच्या निवडीनंतर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भाजपाच्या राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी कडून राजन साळवी आणि भाजपाच्या राहुल नार्वेकर यांच्यामध्ये ही निवडणूक होती. विधानसभेच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर शिरगणतीने मतमोजणी करण्यात आली. यामध्ये भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांना 164 मतं मिळाली आहेत. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी राहुल नार्वेकर यांच्याबाजूने मतदान केले आहे. मनसेच्या राजू पाटील यांनी देखील राहुल नार्वेकर यांना मतदान केले. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रातील आणि देशातील देखील सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.

भाजप आमदार राहुल नार्वेकर भाजपा मध्ये येण्यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये होते. सध्या ते मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. नाईक हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती आहेत. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कुलाब्यातून त्यांनी काँग्रेसचे अशोक जगताप यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र विधिमंडळ, विधानपरिषद आणि विधानसभेची दोन्ही सभागृहे चालवण्याची जबाबदारी सासरे- जावई यांच्यावर येणार हा योगायोग ठरत आहे. पण रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.