भारत जोडो यात्रेदरम्यान कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savakar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. सावरकरांचे नातू रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) आणि आमदार सदा सरवणकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यापूर्वी रणजित सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्रात काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान विनायक दामोदर सावरकरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे.
विनायक दामोदर सावकार यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येऊ देणार नसल्याची धमकी शेवाळे यांनी दिली आहे. यासाठी दादर येथील शिवाजी पार्क येथील बाळ ठाकरे यांच्या स्मारकाजवळ आंदोलन पुकारण्यात आले. आंदोलनावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, प्रवक्त्या शितल म्हात्रे उपस्थित होते.
राहुल गांधींनी वीर सावरकरांवर आरोप केल्यानंतर शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राहुल गांधींची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा थांबवण्यास सांगितले होते. ‘काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीही वीर सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता, त्याविरोधात दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी आंदोलन केले होते’, असे राहुल शेवाळे म्हणाले.
सावरकरांचे नातू रणजित सावरकर हेही आंदोलनावेळी उपस्थित होते. शनिवारी (19 नोव्हेंबर) राहुल गांधींच्या विरोधात पुकारलेल्या हल्लाबोलमध्ये रणजित सावरकर म्हणाले की, ‘घडल्या प्रकारावर उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही याचे मला वाईट वाटते. मला आठवते की, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एकदा काँग्रेसच्या मुखपत्रात वीर सावरकरांचा अपमान झाला होता, तेव्हाही मी तक्रार केली पण त्यांनी काहीच केले नाही.’
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत राहुल गांधींच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजपही काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी राहुल गांधींचे सावरकरांवरील वक्तव्य अशोभनीय असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तर सावरकरांबद्दल या केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी तुटू शकते, असे म्हटले आहे. (हेही वाचा: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “शिवाजी जुन्या काळातले आदर्श”)
गुरुवारी (17 नोव्हेंबर) राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान सांगितले होते की, सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान तुरुंगातून सुटका करण्याबद्दल आणि त्यांना 60 रुपये पेन्शन मिळण्याबद्दल ब्रिटिश सरकारकडे माफीनामा लिहिला होता. राहुल यांनी सावरकरांचे पत्र म्हणून एक पेपर सादर केला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा तुरुंगात होते, पण कोणीही इंग्रजांना माफीनामा लिहिलेला नाही, असेही ते म्हणाले होते.