Citizenship Amendment Act: केंद्र सरकारने संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (Citizenship Amendment Act) बहुमताने संमत केले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा विषय संसदेपुरता निकाली निघाला असला तरी, संसदेबाहेर मात्र हा विषय चांगलाच पेटला आहे. या कयद्याला देशभरातून विरोध होत आहेत. खास करुन इशान्य भारतात. इशान्य भारतात सुरु झालेला नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा संपूर्ण देशभरात पोहोचला आहे. राजधनी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातही या कायद्याचा प्रचंड विरोध होत आहे. दरम्यान, या विरोधावरुनच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यंनी थेट वक्तव्य केले आहे. नागरिकत्व कायद्याला (CAA) विरोध करणारे देशद्रोही असल्याचे वक्तव्य भिडे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही संभावना भिडे यांनी फालतू अशी केली आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे हे कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आपल्या वक्तव्यात भिडे म्हणाले, आपला देश हा माणसांचा आहे. मात्र, देशभक्त माणसांचा नाही. हे देशाचे दुर्दैव आहे. ज्यांचा स्वार्थ हाच धर्म आहे असे लोक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. खरं तर या कायद्याचा कश्मीर ते कन्याकूमारी पर्यंत सर्व नागरिकांनी स्वागत करायला हवे. या कायद्यामुळे सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. पण, तसे घडत नाही. देशभक्त या कायद्याचे समर्थनच करेन परंतू जे या कायद्याला विरोध करत आहेत ते देशद्रोही आहेत', असेही भिडे यांनी म्हटले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायद्यावर शिवसेना पक्षाने घेतलेल्या भूमिकेबाबत प्रसारमाध्यमांनी भिडे यांना विचारले असता, शिवसेना या कायद्याच्या विरोधात नाही. तसेच, या कायद्याच्या विरोधातही बोलत नाही. शिवसेनेच्या बोलण्यातील बारकावे लक्षात घ्यायला हवेत. ते ध्यानत घेतले तर शिवसेना वाईट बोलत नाही हे लक्षात येईल. शिवसेना या कायद्यास विरोध करत नाही. मात्र, त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत, असेही भिडे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शन करणार्यांवर कडक कारवाई करा- स्मृती इराणी)
दरम्यान, संभाजी भिडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची फालतू अशी संभावना केली. राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता 'त्या फालतू माणसाबद्दल जनता आणि राष्ट्राने विचार करुन आपला वेळ वाया घालवू नये. देशाचं दुर्दैव असं की, ज्यांची उंची नाही ते लोक राजकारणात आले आहेत. त्यांचा विचारही करु नका. त्यांचा विचार करुन वेळ दवडून नये', अशा तीव्र शब्दांत भिडे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.