Purandar International Airport Update: पुण्यातील पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport At Purandar) उभे राहत आहेत. या प्रस्तावित ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना या विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. भूसंपादनाची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची ही मोठी घोषणा आहे.
पुणे येथे समर्पित आंतरराष्ट्रीय विमानतळ ही काळाची गरज आहे आणि पुरंदर येथील नवीन विमानतळ पुण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण प्रदेशासाठी आणि औद्योगिक वाढीसाठी गेम चेंजर ठरेल, असे सरकारचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, आगामी पुणे आऊटर रिंग रोड (ORR) जवळील या प्रस्तावित विमानतळाची जागा प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी सुलभ करेल.
येत्या काही दिवसांत या प्रक्रियेला वेग येईल, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘येत्या तीन ते चार दिवसांत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मी भूसंपादनाबाबत सविस्तर बैठक घेणार आहोत. येत्या आठ दिवसांत, आम्ही प्रकल्पासाठी मॉडेलला अंतिम रूप देऊ आणि त्यानंतर अधिग्रहणाला सुरुवात करू.‘ पुण्यातील पुरंदर येथील विमानतळाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि गेल्या दशकात आयटी आणि उत्पादन क्षेत्रात झालेली वाढ पाहता, आंतरराष्ट्रीय विमानतळ हा शहर आणि एकूणच महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. (हेही वाचा; State Govt Decision On Rajyamata Gomata: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! देशी गायी 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित)
पुण्याचे खासदार आणि राज्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जूनमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच, संरक्षण मंत्रालय (MoD) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांनी पुरंदर येथील मूळ जागेवर प्रस्तावित विमानतळाला मंजुरी दिल्याचे जाहीर केले. तांत्रिक अडथळे दूर झाल्याने पुण्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्प प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.