हेल्मेटसक्ती विरोधात पुणेकरांची पगडी घालून बाईक रॅली
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: TheQuint)

नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. पुणेकर मात्र या नव्या नियमाच्या सुरुवातीपासूनच विरोधात होते. आज (3 जानेवारी) हेल्मेटसक्ती विरोधात पुणेकर रस्तावर उतरले आहेत. विनाहेल्मेट पगड्या घालून बाईकर्स आंदोलनात सहभागी झाले आहेत. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समिती आणि पुणेकरांनी पोलिस आयुक्तालयाच्या दिशेने बाईक रॅली काढली आहे.

पत्रकार संघ ते पुणे आयुक्तालय या दरम्यान ही रॅली काढण्यात आली असून त्यानंतर पुणे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांच्यासमोर हेल्मेटसक्तीपासून मुक्ती मिळावी म्हणून निवदेन सादर केले जाणार आहे.

रॅली काढून विरोध करण्याचा निर्णय हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचं हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच मत आहे. पुणेकरांची हेल्मेटसक्तीपासून मुक्तता व्हावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे.

हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या तब्बल 7 हजार 490 जणांवर कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी 3 लाखांना दंड वसूल केला आहे.