पुणे: मोबाईल खेळाच्या व्यसनातून कॉलेज तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

आजकाल तरूणाईमध्ये मोबाईल फोन, इंटरनेट आणि गेम्सचं व्यसन वाढत असल्याचं चित्र आहे. यामध्ये पुण्यात आज (19 जुलै) मोबाईल गेमच्या नादामध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन तरूणाने गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हा प्रकार पुण्यात हवेली तालुका पेरणेफाटा येथे घडला आहे. मृत मुलाचं नाव दिवाकर उर्फ़ संतोष माळी असं असून मोबाईल वेडापायी त्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. देशातील पहिलं मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र प्रयागराज मध्ये; पहिल्याच दिवशी 15 जण उपचारासाठी दाखल

दिवाकरचे वडील एका कंपनीमध्ये नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. माळी कुटुंब हे मूळचे कोल्हापूर येथील कागलचे रहिवासी आहेत. दिवाकर वाघोलीत कॉमर्सच्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याला मोबाईल खेळाचं व्यसन जडले होते. या वेडापायी त्याने मागील दिवस कॉलेजलादेखील बुट्टी मारली होती.  त्याचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आलं आहे.

दिवाकरच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली असून सध्या पोलिस तपास सुरू आहे. दिवाकरच्या मोबाईलची देखील तपासणी सुरू आहे. दिवाकरला नेमक्या कोणत्या खेळाचं व्यसन होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र त्याच्या मृत्यूने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आजकाल तरूणाई मध्ये पबजी सारख्या अनेक खेळांचे वेड आहे. यासोबतच ब्ल्यू व्हेल, मोमो चॅलेंज या सारख्या व्हायरल होत असलेल्या ट्रेंडमध्ये अनेकांनी आत्महत्येसारखी टोकाची पावलं उचलली आहेत.