प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या दरम्यान आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. तरीही गैरमार्गाने अनेक गोष्टी घडत असल्याचे समोर आले आहे. तर पुणे (Pune) येथील रामटेकडी परिसरात अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर दहशतवाद माजवण्याचा हा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक अशोक कांबळे यांच्या कार्यालयासमोर पार्किंग करण्यात आलेल्या 6 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पहाटेच्या वेळी हा प्रकार घडला असून अज्ञातांकडून कार, रिक्षा आणि एक टेम्पोची तोडफोड केली आहे. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: PwD App च्या मदतीने दिव्यांग मतदार घरबसल्या करू शकतील मतदार नोंदणी ते व्हिलचेअरसाठी विनंती)

तर बुधवारी निवडणूक आयोगाकडून धारावी विधानसभा मतदारसंघातून एका कारमध्ये लाखो रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी धीरेंद्र छेडा नावाच्या व्यक्तीच्या कारमध्ये ही रोकड सापडल्याने आयोगाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी सी व्हिजील अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपवर दखलपात्र तक्रारींवर 100 मिनिटांमध्ये कारवाई करण्याला प्राधान्य दिले जाते.मागील 15 दिवसांत सुमारे 107 तक्रारी आल्या असून 51 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात 21 ऑक्टोबर दिवशी निवडणूकीसाठी मतदान होईल तर 24ऑक्टोबरला मतमोजणी आहे.