Deenanath Mangeshkar Hospital

पुण्यातील (Pune) तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी (Tanisha Bhise Death Case) डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी दिली. हे कलम निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याशी संबंधित आहे, जो सदोष मनुष्यवध नाही. पुणे पोलिसांनी डॉ. घैसास यांना सुरक्षा पुरवल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, डॉक्टरांनी वेळेत उपचार दिले नाहीत आणि रुग्णाला साडेपाच तास वाट पाहायला लावली, ज्यामुळे आणखी गुंतागुंत निर्माण झाली आणि मृत्यू झाला. डॉ. सुश्रुत घैसास हे पुण्यातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि गर्भरोगतज्ज्ञांपैकी एक आहेत. ते पुण्यातील एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूती, स्त्रीरोग आणि गर्भरोगतज्ज्ञांसाठी सल्लागार म्हणून काम करत होते. तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.

भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सचिवांच्या पत्नी तनिषा भिसे यांचे जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात निधन झाले. त्याआधी मंगेशकर रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत व त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तनिषा भिसेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या मते उपचार करणारे डॉक्टर डॉ. घैसास यांनी उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांना 10 लाख रुपये जमा करण्यास सांगितले होते. कुटुंबीय 10 लाख रुपये जमा करू शकले नाहीत, त्यानंतर मनीषा यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Delhi Building Collapse: पूर्व दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये 6 मजली इमारत कोसळली; मृतांची संख्या 11 वर पोहोचली, बचावकार्य सुरू)

इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉ. सुश्रुत घैसास यांचा बचाव करत म्हटले की, त्यांचे उपचार योग्य होते आणि त्यांना दोषी ठरवणे अयोग्य आहे. मात्र महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने डॉ. घैसास यांना नोटीस पाठवली. या प्रकरणी ससूनच्या सहा डॉक्टरांच्या समितीने 16 एप्रिल 2025 रोजी आपला अंतिम अहवाल सादर केला, परंतु पुणे पोलिसांनी तो अस्पष्ट असल्याचे सांगून स्पष्टतेसाठी परत पाठवला. निषा भिसे प्रकरणाने पुण्यातील आणि महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या कमतरतांवर प्रकाश टाकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 एप्रिल 2025 रोजी तनिषा यांच्या कुटुंबाला भेटून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे सांगितले.