Arrest | Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यात कौटुंबिक वादातून एका महिलेने पहाटे तिच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आणि नंतर पतीवर हल्ला केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी या महिलेला तिच्या दोन मुलांची हत्या केल्याबद्दल आणि तिच्या पतीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याबद्दल अटक केली आहे. पत्नीने केलेल्या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी पहाटे 4.21 च्या सुमारास ही घटना घडली. दौंड तालुक्यामधील शिदेवस्ती (स्वामी चिंचोली) येथे या घटनेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल दुर्योधन मिंधे (30) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने तिच्या दोन मुलांची, शंभू (1) आणि सायली (2) यांची हत्या केली आणि तिच्या 36 वर्षीय पती दुर्योधनवर क्रूरपणे हल्ला केला. जखमी पतीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दादास म्हणाले, मुलांची अशी क्रूर हत्या आणि पतीवर हल्ला हे जोडप्यातील वैवाहिक कलहाचे परिणाम असू शकतात.

माहितीनुसार, कोमल आणि दुर्योधन यांचे लग्न एप्रिल 2028 मध्ये मोठ्या थाटामाटात झाले होते. दुर्योधन हा पुण्यातील खराडी येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नेटवर्क इंजिनिअर आहे. सध्या तो घरून ऑफिसचे काम करत होता. दुर्योधन त्याची पत्नी, मुले, आईवडील आणि भाऊ यांच्यासह संयुक्त कुटुंबात राहत होता. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होत होते. शनिवारी सकाळी कोमलने दोन्ही मुलांचा गळा दाबून खून केला आणि नंतर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या तिच्या पतीवरही हल्ला केला. (हेही वाचा: Nagpur Teen Suicide Case: 'मृत्यूनंतर काय?' च्या कुतूहलामध्ये 12वी च्या विद्यार्थीनीने गमावला जीव; हातावर, गळ्यावर ब्लेडचे वार)

या हल्ल्यानंतर घरात आवाज झाल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य जागे झाले. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांना आणि दुर्योधनला भिगवण येथील रुग्णालयात नेले. भिगवण येथील डॉक्टरांनी त्यांना बारामती येथील रुग्णालयात रेफर केले, जिथे दोन्ही मुलांना पोहोचताच मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी पत्नी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती परंतु कुटुंब आणि नंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तिला अटक करण्यात आली.  दरम्यान, अधिकारी कोमलची मानसिक स्थिती आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा किंवा मानसिक त्रासाचा इतिहास तपासत आहेत. मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले, तर दुर्योधनवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.