महिलेने आपल्या 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये पाळल्या तब्बल 300 मांजरी (संग्रहित संपादित प्रतिमा- Pixabay)

पुण्यातील (Pune) हडपसर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेने तिच्या फ्लॅटमध्ये तब्बल 300 हून अधिक मांजरी पाळल्या होत्या. शेजारील लोकांना याचा त्रास होऊ लागला, दुर्गंधी आणि सततच्या आवाजाने त्रास होऊन त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली व त्यानंतर ही बाब उघडकीस अली. तक्रारी आल्यानंतर, पोलीस आणि पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने फ्लॅटची तपासणी केली. यावेळी त्यांना तिथे 300 मांजरी आढळल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतील वातावरण अत्यंत घाणेरडे होते आणि असह्य दुर्गंधी येत होती.

पोलिसांनी सांगितले की, मांजरींना योग्य ठिकाणी हलविण्यासाठी फ्लॅटच्या मालकाला नोटीस देण्यात आली आहे. याबाबत पुढील कारवाई पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीखाली केली जाईल. सोसायटीतील लोकांनी प्रशासनाकडून यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. याबाबत हडपसर स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले म्हणाले की, स्थानिक रहिवाशांनी मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक सी 901 च्या मालक रिंकू भारद्वाज आणि तिची बहीण रितू भारद्वाज यांच्याविरुद्ध पीएमसीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

सोसायटीतील रहिवाशांचे म्हणणे होते की, एका फ्लॅट मालकाने त्याच्या 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी पाळल्या आहेत, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. फ्लॅटमधून सतत दुर्गंधी येत होती आणि मांजरींच्या आवाजामुळेही अनेक समस्या निर्माण होत होत्या. अनेक वेळा तक्रार करूनही कोणताही उपाय निघाला नाही, त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. या तक्रारींच्या आधारे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पोलिसांसह सोसायटीला भेट दिली. पथक जेव्हा घरात गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला. घरातील वातावरण अतिशय गलिच्छ होते. गोष्टी अस्ताव्यस्त पडल्या होत्या, अजिबात स्वच्छता नव्हती आणि सर्वत्र दुर्गंधी येत होती. (हेही वाचा: Rat Found in Chocolate Shake: ऑनलाइन मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये आढळले मृत उंदीर, कॅफे मालकाविरोधात गुन्हा दाखल)

महिलेने 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये पाळल्या तब्बल 300 मांजरी- 

चौकशीत असे आढळून आले की, मांजरींना लसीकरण किंवा निर्जंतुकीकरण करण्यात आले नव्हते, तसेच मालकांनी या संदर्भात कोणतेही रेकॉर्ड ठेवले नव्हते. पशुसंवर्धन विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली आणि फ्लॅट मालकाला शक्य तितक्या लवकर मांजरी इतर ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या. तेथे राहणाऱ्या लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्य समस्या सोडवण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. अपार्टमेंट मालकांविरुद्ध अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.