पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टरांनी सोमवारी पहाटे एका अपंग रुग्णाला विश्राम वाडी परिसरातील निर्जनस्थळी सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हा अपंग रुग्ण शोधून त्याला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. आता बंडगार्डन पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेनंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या वृत्तीबद्दल संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड हे निराधार रुग्णांची सेवा करतात. रस्त्यावर असहाय्य पडलेल्या जखमींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. गेल्या आठवड्यात त्यांनी एका निराधार रुग्णाला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी रुग्णाला पाहण्यासाठी ते गेले असता रुग्ण रुग्णालयात नव्हता.
याबाबत त्यांनी रुग्णालयातील इतर रुग्णांकडे विचारपूस केली असता त्या रुग्णाला डॉक्टरांनी नेले, मात्र परत आणले नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी रितेश गायकवाड यांच्यासह रुग्णालयाबाहेर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्री दीड वाजता रितेश गायकवाड हॉस्पिटलबाहेर रिक्षा घेऊन उभा होता. त्याचवेळी ससून हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्याने दोन्ही पाय नसलेल्या एका रुग्णाला जखमी अवस्थेमध्ये एका रिक्षात घालून नेले.
रिक्षातून डॉक्टर आणि त्यांचे हॉस्पिटल सहकारी विश्रांतवाडीतील एका घनदाट वटवृक्षाजवळ पोहोचले. तिथे डॉक्टरांनी रुग्णाला अंधार आणि पावसात झाडाखाली तसेच सोडले. यानंतर रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने सोमवारी पुन्हा त्या रुग्णाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. (हेही वाचा; Mukhyamantri Vayoshri Yojana: राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांकरिता राबवणार ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’; जाणून घ्या स्वरूप व पात्रता निकष)
या घटनेनंतर ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांनी आरोपी डॉक्टरला निलंबनाचे पत्र दिले. पत्रात नमूद केले आहे की, ‘आम्ही या डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली असून, ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, संबंधित डॉक्टरवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.’ भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 125 (जीव किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) अंतर्गत गुन्ह्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.