Pune Sessions Court ordered the release of Anand Teltumbde (Photo Credits: Twitter/@@AnandTeltumbde)

भीमा - कोरेगाव हिंसाचारामध्ये (Bhima Koregaon case) नक्षलवाद्यांशी संबंधअसल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना सोडण्याचे आदेश आज पुणे  न्यायालयाने (Pune Sessions Court) दिले आहेत. डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. डॉ. तेलतुंबडे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचं 4 आठवड्यांचे संरक्षण (Interim Protection ) असताना अटक करणं हा न्यायालयाचा अपमान असल्याचं सांगत त्यांची तातडीने सुटका करावी असे आदेश विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत.

डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा मार्ग मोकळा?

आज सकाळी विमानतळावरून डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. एल्गार परिषदेच्या आयोजनात डॉ. तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचा संशय आहे. एल्गार परिषदेनंतर मागील वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे हिंसाचार भडकला. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरु आहे. या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना अटक केली होती. मात्र आज पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे.