Fraud । (Photo Credits: IANS) | Representational Image

पुणे (Pune) शहरातील एका विशेष सीबीआय (CBI) न्यायालयाने मंगळवारी कॅनरा बँकेच्या (Canara Bank) डेक्कन जिमखाना शाखेचे माजी मुख्य व्यवस्थापक एसआर हेगडे (S. R. Hegde) यांना 300 कोटी रुपयांच्या घोट्याळ्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हेगडे यांना पाच वर्ष आणि इतर तीन जणांना तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

तीन वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये गणेश कोल्हे, खाजगी लिमिटेड कंपन्यांचे तत्कालीन खाते सहाय्यक गणेश गायकवाड आणि रत्ना मेटल मार्ट या फर्मचे मालक मनोज एस. साळवी यांचा समावेश आहे. वॅरॉन अॅल्युमिनियम प्रायव्हेट लिमिटेड (व्हीएपीएल) आणि वॅरॉन ऑटो कॉम्प प्रायव्हेट लिमिटेड (व्हीएसीपीएल) या दोन खासगी मर्यादित कंपन्यांना या प्रकरणी कोर्टाने प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Mehul Choksi PNB Scam: पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोकसी याला भारतात खरोखरच आणता येईल?)

कॅनरा बँकच्या डेक्कन जिमखाना शाखेने 246 बिलासंदर्भात 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार बँक ऑफ इंडियाने केली होती. या तक्रारीनंतर सीबीआय केस रजिस्टर केली होती, अशी माहिती सीबीआयने मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात दिली. 29 फेब्रुवारी 2016 रोजी दोन खाजगी कंपनीच्या मॅनेजिंग डिरेक्टरने खोटी एल्सी मिळवली होती. ही एल्सी कॅनरा बँकच्या डेक्कन जिमखाना शाखेतर्फे देण्यात आली होती. यानंतर यासंदर्भात 246 खोटी बिले बँक ऑफ इंडियाला देण्यात आली होती.

सीबीआयने सांगितले की, या फसव्या व्यवहारांमधून मिळालेले पैसे पुन्हा वॅरॉन ग्रुप ऑफ कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित केले गेले. तपासानंतर पुण्यातील विशेष सीबीआय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.