Pune Rickshaw Fare Hike: पुण्यात 22 नोव्हेंबर पासून रिक्षाच्या भाड्यात वाढ, 1.5 किमीसाठी 21 रुपये द्यावे लागणार
Auto Rickshaw (Photo Credits: PTI)

Pune Rickshaw Fare Hike:  पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी आता रिक्षाच्या प्रवासासाठी नागरिकांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. त्यानुसार 1.5 किमीसाठी 18 रुपयांऐवजी आता 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर प्रत्येक किमीसाठी 14 रुपये नागरिकांकडून भाडे स्विकारले जाईल असे पुणे विभागाच्या आरटीएने स्पष्ट केले आहे. याआधी ऑक्टोंबर महिन्यात आरटीएने 1.5 किमीसाठी रिक्षाचे भाडे 2 रुपयांनी वाढवण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर प्रत्येक किमीसाठी 1 रुपया द्यावा लागेल. हा नियम 8 नोव्हेंबर पासून लागू होणार होता. पण तो काही कारणास्तव स्थगित केला गेला. परंतु आता भाडे पहिल्या 1.5 किमीसाठी 3 रुपयांनी आणि त्यानंतर प्रत्येक किमीसाठी 2 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

RTA ने हा निर्णय खटुआ समितीच्या अहवालात केलेल्या शिफारशींवर घेण्यात आला आहे कारण गेल्या काही दिवसांपासून सीएनजीसाठी प्रति किलो 4 रुपये वाढल्यानंतर वाहन संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. यापूर्वी 1.5 किमीसाठी 18 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी 12.31 रुपये भाडे नागरिकांकडून घेतले जात होते.(Pune: वीजबिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या 800 शाळांची बत्ती गुल; अडीच कोटींचे थकीत लाईट बिल पंधरा दिवसात भरणार असल्याची माहिती)

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात 12 ऑक्टोंबरला आरटीओची आढवा बैठक झाली. त्यामध्ये खटुआ समितीच्या अहवालावर चर्चा झाली. तेव्हा असा निर्णय घेण्यात आला की, पहिल्या 1.5 किमीसाठी 20 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किमासाठी 13 रुपये भाडे असेल. मात्र रिक्षाचालकांच्या संघटनांनी या निर्णयाचा विरोध केल्याने मंगळवारी नवे रिक्षा भाड्याचे दर जाहीर करण्यात आले.

आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबरपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रात, 25% वाढीसह सुधारित दर मध्यरात्री ते पहाटे 5 दरम्यानच्या भाड्यासाठी लागू होतील. या तीन कार्यक्षेत्रांव्यतिरिक्त, उर्वरित जिल्ह्यासाठी रात्रीच्या वेळी अतिरिक्त 40 टक्के लागू होईल.

सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 60 बाय 40 सेंटीमीटरच्या बॅगसाठी 3 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, ऑटो चालकांना सुधारित भाड्यांसह मीटर कॅलिब्रेशनसाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या प्रवाशांचे मीटर सुधारित भाड्यासाठी कॅलिब्रेट केलेले आहेत, त्यांच्याकडून केवळ त्या ऑटोचालकांना सुधारित भाडे घेण्याची परवानगी असेल,” असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.

रिक्षाचालकांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. आरटीओने आमच्या मागण्या पूर्ण केल्या असून अखेर आम्हाला योग्य ती रिक्षाच्या भाड्यात वाढ करुन दिली. आता आम्ही सर्व ऑटो चालकांना त्यांची मीटर कॅलिब्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाहू. असे पुणे ऑटोरिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष बापू भावे यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे नागरिक नाराज आहेत. प्रवाशी किरण सावळे यांनी असे म्हटले की, मी नेहमीच कार्यालयात पोहचण्यासाठी रिक्षाने जायचो. पण आता दरवाढ केल्याने प्रवास थोडा खर्चिक होणार आहे.