
Pune Weather Update: सध्या पुणेकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पुण्यातील या आठवड्यात हवामान उष्ण (Pune Temperature) राहणार आहे. तसेच या आठवड्यात पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नसून आठवडाभर तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे शहरात शनिवारी किमान तापमानात वाढ झाली. लोहेगावमध्ये तापमान 25.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा 5 अंशांनी जास्त होते. ताज्या हवामान अपडेटनुसार, शिवाजीनगरमध्ये किमान तापमान 22.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 2.1 अंश जास्त आहे, तर मगरपट्टा 25.8 अंश सेल्सिअस आणि कोरेगाव पार्क 25.2 अंश सेल्सिअस राहिले. गांधीनगर येथील भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेचे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ दिलीप मावळणकर यांनी सांगितले की, सतत उच्च किमान तापमान चिंताजनक आहे. शनिवारी दुपारी 3 वाजता, एका खाजगी हवामान अंदाजानुसार, पुण्याचे वास्तविक तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले.
आयएमडीनुसार, शिवाजीनगरमध्ये कमाल तापमान 39.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 1.4 अंश जास्त आहे. तथापी, शहरातील इतर भागात आणखी जास्त तापमान नोंदवले गेले. लोहेगावमध्ये 42.5 अंश सेल्सिअस आणि किमान 25.3 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचले. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पुढील 4-5 दिवस तापमान 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज)
आयएमडी-पुणे शास्त्रज्ञ एसडी सानप यांनी सांगितले की, सापेक्ष आर्द्रतेत 5-10% वाढ होऊन आर्द्रता वाढली आहे. यापूर्वी, उत्तर मध्य महाराष्ट्रापासून कोमोरिन क्षेत्रापर्यंत एक ट्रफ पसरला होता. तो ईशान्य विदर्भापासून कोमोरिन क्षेत्रापर्यंत पसरला होता ज्यामुळे शनिवारी ओलावा वाढला. (हेही वाचा - India’s Hottest City: नागपूर देशातील सर्वात उष्ण शहर; तापमान 44 अंशा पार)
दरम्यान, स्वतंत्र हवामान अंदाज अधिकारी अभिजित मोडक यांनी सांगितले की, पुणे आधीच शहराच्या या वेळेच्या सरासरीपेक्षा सरासरी 2 अंश सेल्सिअस जास्त तापमान अनुभवत आहे. उष्णतेच्या या सततच्या कालावधीमुळे रात्रीच्या वेळी कमी तापमान देखील वाढले आहे, जे सामान्यपेक्षा 2 अंश सेल्सिअस जास्त आहे.