Chandrakant Patil (Photo Credit - Facebook)

गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकर (Pune) विविध समस्यांनी त्रस्त आहेत. मेट्रोची कामे (Pune Metro), रस्त्यांची कामे व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच काही भागात पाणीटंचाई अशा काही गोष्टींमुळे पुणेकरांचे हाल होत आहेत. पुणेकरांचा हा त्रास कमी करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याचे निर्देश दिले. पाटील यांनी पुणे मेट्रो, पुणे पोलीस वाहतूक विभाग आणि पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शहरातील समस्यांवर चर्चा केली.

शहरातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत पुण्यात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेत त्यांनी सुरू असलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मेट्रोचे काम गोगलगायीच्या गतीने सुरू असल्याने शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. प्रस्तावित लांब मार्गांपैकी एकही मार्ग अद्याप सुरू न झाल्याने रहिवासीही नाराज आहेत.

पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केले. (हेही वाचा: Mumbai Local Train Problem: मुंबई लोकल ट्रेन प्रवास, नियमीत समस्यांमुळे प्रवासी हैराण; तुम्हालाही होतो का असा त्रास? घ्या जाणून)

दरम्यान, पुण्यात मागच्या वर्षी पिंपरी चिंचवड महापालिका स्टेशन ते फुगेवाडी स्टेशन आणि वनाज स्टेशन ते गरवारे कॉलेज स्टेशन अशी मेट्रो सुरु झाली. त्यानंतर पुणे मेट्रोची सोमवारी शिवाजीनगर कोर्ट ते रुबी हॉल स्थानकांदरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. मेट्रोने दिवाणी न्यायालय (शिवाजीनगर) स्थानकावरून दुपारी 3:50 वाजता सुटली 4:07 वाजता रुबी हॉल स्थानकावर पोहोचले. या मेट्रोचा वेग ताशी 10 किमी होता. साधारण एप्रिलअखेर हा नवा मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे.