
Pune Viral News: पुणे (Pune Crime News) येथील शास्त्रीनगर चौकात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य (Public Obscenity) करुन फरार झालेल्या तरुणास सातारा येथे अटक करण्यात आली आहे. गौरव मनोज आहुजा (Gaurav Ahuja) असे त्याचे नाव आहे. तो एका व्यवसायिकाचा मुलगा आहे. बीएमडब्लू (BMW) कार रस्त्याच्या मध्यभागी उभा करत सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन (Pune BMW Incident) आणि अश्लिल कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सातारा पोलिसांनी (Satara Police) शनिवारी रात्री (8 मार्च) केलेल्या कारवाईत त्यास अटक केली आणि पुढील चौकशीसाठी पुणे पोलिसांकडे (Pune Police) सोपवले. पुणे पोलिसांनी गौरव याचा ताबा घेतला असून, त्याची चौकशी सुरु आहे. त्याच्या मित्रासही अटक केल्याचे वृत्त आहे.
उच्चभ्रू मस्तवालपणाचा कळस
पुणे शहरातील येरवडा परिसरातील शास्त्री चौक येथील एका पदपथावर गौरव आहुजा त्याची आलिशान बीएमडब्लू (BMW) कार घेऊन आला. जी त्याने रस्त्याच्या मध्येच थांबवली आणि वाहतूकीस अडथळाही निर्माण केला. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने खाली उतरत पदपथावरच मूत्रविसर्जन केले आणि पदपथावर उपस्थित असलेल्या नागरिकांकडे पाहून कथितरीत्या सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तनही केले. एका सजग नागरिकाने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रीत केली आणि पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. उच्चभ्रू मस्तवालपणा दाखवणारी सदर घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच तीव्र संताप निर्माण झाला आणि नागरिकांकडून या तरुणाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी झाली. त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी सूत्रे हालवत या तरुणास अटक केली. ज्याचे नाव गौरव आहुजा असल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. (हेही वाचा, Pune BMW Incident: पुणे येथे बीएमडब्ल्यू कारमधील उच्चभ्रू तरुणाचे शास्त्री चौकात लज्जास्पद वर्तन; व्हिडिओ व्हायरल)
माफी आणि आत्मसमर्पणाचा कांगावा
दरम्यान, सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहाच्या प्रसारमाध्यमांतून घटनेबाबत वृत्त आणि संताप व्यक्त होताच गौरव आहुजा जागा झाला. त्याने सोशल मीडियाचा वापर करत जाहीर माफी मागितली, आपण चुक केली असल्याचेही तो म्हणाला. तसेच, आपण नशेच्या अंमलाखाली होतो. त्यामुळे आपणास सुधारण्याची एक संधी द्या. आपण येरवडा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहोत, असेही तो बोलताना दिसत आहे. पण, त्याने केलेल्या वक्तव्याचे आचरण करण्यापूर्वीच सातारा पोलिसांनी त्यास ताब्यत घेतले आणि कायदेशीर कारवाईसाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले. (हेही वाचा, Rubbing Balm on Victim's Private Parts: गुप्तांगाला बाम चोळून 20 वर्षीय तरुणास बेदम मारहाण, चित्रीकरण करुन व्हिडिओही व्हायरल; Hinjawadi परिसरातील घटना)
पोलीस कारवाई आणि मित्रासही अटक
दरम्यान, याच प्रकरणात येरवडा पोलिसांनी यापूर्वी आहुजाचा सहकारी भाग्येश ओसवाल याला अटक केली आहे. सार्वजनिक अश्लीलता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप करत त्याच्याहीविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांच्या अहवालानुसार, दारूच्या नशेत असलेल्या आहुजाने एका वर्दळीच्या चौकात आपली कार थांबवली, सार्वजनिक ठिकाणी लघवी केली आणि हे कृत्य रेकॉर्ड करणाऱ्या एका व्यक्तीला बाजूला केले. व्हिडिओमध्ये तो आपली पँट खाली करत आणि बेपर्वाईने वेगाने निघून जाण्यापूर्वी त्याच्या कारमध्ये असभ्य वर्तन करताना दिसत होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलांनी या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त केला.
गौरव आहुजा याची गुन्हेगारी पार्श्वभूमी
दरम्यान, प्रसारमाद्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गौरव आहुजा याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने या आधीही काही गुन्ह्यांमध्ये स्वत:चा सहभाग नोंदवला आहे. ज्यामध्ये सन 2021 मध्ये, पुण्याच्या गुन्हे शाखेने त्याला दारू व्यावसायिकाकडून बेकायदेशीर सट्टेबाजीच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये उकळल्याबद्दल अटक केली होती. बेटिंग रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याचेही तपासात उघड झाले, विशेषतः ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे.