पुणे पोलिसांनी आयुक्तांना ठोठावला दंड; चारचाकी वाहनाला फाडली ट्रिपल सीटची पावती
(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image

'आमच्या पुण्यात काहीही घडू शकतं हं..!' असं सांगणाऱ्या पुणेकरांना इतरांना सांगण्यासाठी आणखी एक नवा कोरा किस्सा मिळाला आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष असलेल्या पुणे पोलिसांनी भोंगळ कारभार करत चारचाकी वाहनाला (Four Wheeler) चक्क ट्रिपल सीटची (Triple Seat) पावती फाडली आहे. धक्कादायक असे की, हे वाहनही कोणा साध्यासुध्या व्यक्तीचे नव्हे बरं! हे चारचाकी वाहन आहे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आयुक्तांचे (Pimpri-Chinchwad Municipal Commissioner). निगडी येथील सूरज स्वीट परिसरात हा प्रकार घडला. या प्रकारानंतर 'अरेच्चा! असे कसे घडले?' असा उत्सुकतादर्शक प्रश्न करत पुणेकरांध्ये या प्रकाराची भलतीच चर्चा सुरु आहे.

घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर (Commissioner Shravan Hardikar) यांच्या चारचाकी वाहनाला (एम. एच-१४ सी.एल १५९९ ) दंड ठोठावला. पोलिसांनी 200 रुपये दंड आकारला खरा. पण, आपण कोणत्या वाहनाला कोणत्या कारणासाठी हा दंड आकारत आहोत याचे भानच पोलिसांना राहिले नाही. त्यांनी थेट ट्रिपल सीटचा दंड लागू केला. पण, गंमत अशी की दंड आकारलेली वाहन ही दुचाकी नसून चारचाकी आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर घडलेला प्रकार ही अक्षम्य चूक असल्याचे वाहतूक पोलिसांनी मान्य केले. (हेही वाचा, पुणेकरांच काही खरं नाही, आगोदर होर्डिंग, आता थेट मेट्रोची भलीमोठी ड्रील मशीन भररस्त्यात कोसळली)

दरम्यान, वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, एम. एच-१४ सी.एल १५९९ हा मनपा आयुक्तांच्या वाहनचा क्रमांक आहे. पण, दुसऱ्या एका दुचाकीचाही नंबर साधर्म्य दाखवणारा आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून सीरियल क्रमांकात 'डी. एल'च्या जागी चुकून 'सी. एल' लिहिले गेले. त्यामुळे चुकून दुचाकी ऐवजी आयुक्तांच्या वाहन क्रमांकाने पावती फाटली. केवळ नजरचुकीनेच हा प्रकार घडल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले.