Accident Representational image (PC - PTI)

महाराष्ट्रात आज नव्या आठवड्याची सुरूवात दोन भीषण अपघाताच्या बातमीने झाली आहे. पुणे मुंबई हायवे (Pune-Mumbai Highway) वे वर आज सकाळी 2 ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी आहेत. जखमींवर नजिकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मीडीया रिपोर्ट्सनुसार,  पुण्यामध्ये कात्रज बोगद्यातून आज पहाटे पाचच्या सुमारास एक दारूची वाहतूक करणारा ट्रक मुंबईकडे जात होता. हा ट्रक भूमकर पूलावर येताच मागून येणार्‍या ट्रकने त्याला धडक दिली. या अपघातामध्ये ट्रक चक्काचूर झाला आहे. यावेळेस ट्रकमधील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे पुलावर वाहतूक खोळंबली होती.

पुण्यामध्ये दुसरा अपघात हा पिंपरी चिंचवड मध्ये किवळे हद्दीत असलेल्या मुंबई- बॅंगलोर महामार्गावर सकाळी 4 च्या आसपास झाला आहे. यामध्ये खाजगी बसने टेम्पोला मागून धडक दिली आहे. या अपघातात बसमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जकहमी आहे. 50 जणांना ही बस घेऊन जात होती. दरम्यान चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि टेम्पोवर बस आदळल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातातील जखमी औंध जिल्हा रूग्णालयात आणि काही खाजगी रूग्णालयात दाखल आहेत.

लॉकडाऊननंतर रस्ते वाहतूक आता पुन्हा पहिल्याप्रमाणे सुरू झाली आहे.  2019 च्या तुलनेत 2020 मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येमध्ये  कमालीची घट दिसून आली होती. पण मागील काही दिवसांत कोकणात कशेडी घाट परिसरात देखील वर्‍हाडी बस 300 फूट खाली कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान 11 ते 17 जानेवारी हा आठवडा देशात रोड सेफ्टी अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला जातो.