Pune Metro (PC - Wikimedia Commons)

शहरातील मुसळधार पावसाच्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आजचा पुणे (Pune) दौरा रद्द करण्यात आला. पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार होते. तसेच स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाची आणि पिंपरी-चिंचवड ते निगडी या एलिव्हेटेड कॉरिडॉरची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार होती. यासोबतच ते 22,600 कोटींहून अधिक किमतीचे विविध विकास प्रकल्पही लॉन्च करणार होते. मात्र पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला असला तरी, पुणेकरांनी पुणे मेट्रोला जिल्हा न्यायालय स्वारगेटपर्यंतचा मार्ग सुरू करण्याची विनंती केली आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा प्रवास करायचा झाल्यास एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. पावसाळ्यात स्वारगेटला जाण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र, हा मार्ग सुरू झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी घट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही गुरुवारी पंतप्रधान कार्यालयाकडे पुणे मेट्रोचा जिल्हा न्यायालय ते स्वारगेटपर्यंतचा टप्पा कोणताही विलंब न लावता खुला करण्याची मागणी केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पावसाच्या परिस्थितीमुळे पीएम मोदी पुण्यात येऊ शकले नाही, याचे मला खूप वाईट वाटते. मी पीएमओला विनंती करते की त्यांनी पुणे मेट्रोचा हा मार्ग लवकरात लवकर उघडावा, कारण केवळ उद्घाटन झाले नाही म्हणून, हा मार्ग बंद राहू नये.’ दुसरीकडे, पुणे काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले. आज मेट्रो मार्ग सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पुणेकर, विरोधकांचा जिल्हा न्यायालय-स्वारगेट मार्ग खुला करण्याचा आग्रह-

पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, ते मेट्रो अधिकाऱ्यांना सेवा सुरू करण्याची विनंती करणार आहेत आणि त्यांनी नकार दिल्यास पक्ष त्यांच्या कार्यालयाच्या आवारात आंदोलन करेल. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मोदींच्या दौऱ्यासाठी सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्यावर भर दिला, तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्थानिक समस्यांवर प्रकाश टाकत राज्य आणि केंद्र सरकारसाठी अनेक प्रश्न उपस्थित केले. याशिवाय, आपचे पुणे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनीही सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. (हेही वाचा: Weather Forecast: मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठीही पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

जगदाळे म्हणाले, ‘श्री नरेंद्र मोदी यांचा पुणे शहर दौरा रद्द झाला आहे पण मेट्रो मार्गाचे लोकार्पण झालेच पाहिजे. मागील एक महिन्यापासून स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मार्गाचे काम पूर्ण झाले आहे, फक्त प्रधानमंत्री साहेब यांना वेळ नसल्यामुळे हजारो कोटींची मालमत्ता वापराविना पडून आहे. महाराष्ट्र शासन, पुणे प्रशासन जर आजच नियोजित वेळेत लोकार्पण करणार नसेल. तर पुणेकरांच्या, करदात्यांच्या पैशातून बनवलेला प्रकल्प आहे, तसेच वाहतूक कोंडीचे अनेक प्रश्न आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करणार आहे.’