लग्नपत्रीका वाटण्यासाठी पुणे येथून मुंबई शहरात आलेल्या वरबापाचा लोकलमधून पडून मृत्यू
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुलाच्या विवाहाच्या निमंत्रणपत्रिका (Wedding Cards) नातेवाईकांना वाटण्यासाठी पुणे (Pune ) येथून मुंबई ( Mumbai) शहरात आलेल्या एका वरबापाचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. तानाजी लवांगरे असे या वरबापाचे नाव आहे. ते 59 वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनज (CSMT)  स्टेशनच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये ते होते. दरम्यान, पाय घसरुन ते रुळावर पडले असावेत असा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी वर्तवला आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुर्ला स्टेशन मास्तरांनी रात्री 10.55 च्या सुमारास रेल्वे पोलिसांना फलाट क्रमांक सहावर अपघात घडला असून त्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती दिली. रेल्वे पोलीस घटनास्थळावर पोहोचले तेव्हा एक व्यक्ती अत्यंत जखमी अवस्थेत रुळावर पडून होती. रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. लवंगारे यांच्या डोक्याला गंभीर मार लालल्याचे दिसत होते. लोकलमधून उतरताना त्यांच्या पाय घसरला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. (हेही वाचा, खुशखबर! आता मुंबई ते पुणे, नाशिक प्रवास फक्त 2 तासांत; वंदे भारत च्या धर्तीवर धावणार हाय स्पीड MEMU ट्रेन, जाणून घ्या वैशिष्ठ्ये)

पोलिसांनी तानाजी लवंगारे यांच्या सोबत असलेल्या बॅगची तपासणी केली. त्यात लग्नपत्रीकांचा एक गठ्ठा आढळला. या पत्रिका आणि त्या गठ्ठ्यावर त्यांचे पूर्ण नाव आणि पुणे येथील निवासी पत्ता होता. लवंगारे यांच्या फोनमधून पोलीसांना मुलगा सुमित याचा फोन नंबर मिळाला. पोलिसांनी तानाजी लवंगारे हे आपले कोण असे विचारले असता, ते आपले वडील असून, विवाहाच्या पत्रिका वाटण्यासाठी ते मुंबईला आहेत. येत्या 19 जून रोजी आपले लग्न होणार असल्याची माहितीही सुमितने पोलिसांना दिली. दरम्यान, लवंगारे यांनी ऐरोली येथे राहणाऱ्या आपल्या मुलीला पत्रिका दिली. त्यानंतर इतर नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी ते पुढे निघाले असता. त्यांचा अपघात घडला.