नवी दिल्ली आणि वाराणसी या दोन शहरांदरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) यशस्वीरीत्या सुरु झाली. आता याच धर्तीवर अतिजलद धावणारी ट्रेन मुंबई ते पुणे, नाशिक व वडोदरा या शहरांदरम्यान चालविण्याची योजना आहे. यासाठी नॉन एसी ‘मेमू’ गाडीची चाचणी पुढच्या आठवडय़ापासून सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली, तर मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक हा प्रवास अवघ्या 2 तासांत पूर्ण करता येणार आहे, आणि मुंबई ते बडोदा अंतर चार तासांत कापले जाणार आहे. ही ट्रेन 130 किमी प्रति तास अशा वेगाने धावेल.
याबाबत बोलताना सचिव अग्रवाल म्हणाले, 'आम्ही वंदे भारतच्या पॅटर्नवर आधारीत असलेल्या सेमी हाय स्पीड, मेमू (Main Line Electrical Multiple Unit) ट्रेनची चाचणी पुढच्या आठवड्यात सुरू करणार आहोत. मध्य आणि पश्चिम रेल्वेला अशा प्रकारच्या दोन ट्रेन दिल्या जाणार आहेत.’ ही चाचणी यशस्वी झाली तर प्रवासाचा वेळ 40 टक्क्यांनी कमी होणार आहे. तसेच मार्च 2020 पर्यंत, मुंबई रेल्वेला 12 एसी लोकल ट्रेन दिल्या जाणार आहेत. ही एसी ट्रेन विरारच्या पुढे म्हणजेच चर्चगेट ते डहाणू अशी धावणार आहे. (हेही वाचा: मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; प्रवासातील 30-35 मिनिटांचा वेळ वाचणार)
अशी असणार मेमू ट्रेन –
- ‘मेमू’ ट्रेनची प्रवासी क्षमता 2,618 इतकी आहे.
- प्रत्येक डब्यात टॉयलेटची सोय असणार
- स्टेनलेस स्टीलपासून डब्यांची बॉडी बनविण्यात आलेली आहे.
- ट्रेनचे डबे ट्रेन-18 च्या धर्तीचे असणार आहेत.
- ताशी 130 किलोमीटर वेगाने ही ट्रेन धावणार आहे.
दरम्यान दिल्ली ते वाराणसी पर्यंत धावणारी वंदे भारत ट्रेनच्या व्यवस्थेसाठी आणि बनविण्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ही ट्रेन बनवण्यासाठी दीड वर्ष लागले आहे. या ट्रेनचा ताशीवेग 160 किमी असून, या ट्रेनमध्ये उत्तम प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे ही ट्रेन मेक इन इंडियाचे उदाहरण असून पहिली इंजन नसलेली ट्रेन आहे.