कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यातील लोकल सेवा (Local Train) गेले काही महिने बंद आहे. आता पुणे-लोणावळा (Pune-Lonavala) लोकल सेवा आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 12 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मागील आठवड्याच्या सुरूवातीस, महाराष्ट्र सरकारने कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन वाढवला आणि कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी काही सवलती जाहीर केल्या. यामध्ये रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स सुरु करण्यासोबत पुणे क्षेत्रासाठी लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. आता सोमवार पासून पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी पहिली लोकल सुटेल.
मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले होते की, ‘पुणे प्रांतातील लोकल गाड्या एमएमआर क्षेत्रातील प्रोटोकॉल व कार्यपद्धतीनुसार पुन्हा सुरू होऊ शकतात. पुणे पोलिस आयुक्त हे समन्वय करण्यासाठी नोडल अधिकारी असतील.’ कोविड-19 साथीच्या काळात पुण्यातील लोकल सहा महिन्यांपासून बंद करण्यात आल्या आहेत. आता पुणे आणि लोणावळा दरम्यान कार्यरत लोकांसाठी वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या लोकल ऑक्टोबरच्या मध्यापासून पुन्हा सुरू होणार आहेत.
एएनआय ट्वीट -
#Maharashtra: Pune-Lonavala local train services to resume from 12th October for essential service providers
— ANI (@ANI) October 5, 2020
पुणे रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरच्या मध्यापासून केवळ दोन ते तीन लोकल गाड्या सुरू होतील आणि त्या केवळ आवश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांसाठीच असतील. पुणे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची पुणे पोलिस आयुक्तांसमवेत बैठक झाली व त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मार्गांचा आराखडा प्रस्ताव आयुक्त कार्यालयामार्फत तयार केला जाईल आणि लवकरच रेल्वे विभागाबरोबर शेअर केला जाईल. एकदा रेल्वे विभागाकडून तो मंजूर झाला की अंतिम निर्णय घेतला जाईल. (हेही वाचा: राज्यात कोरोना व्हायरस रुग्णांच्या मृत्यूंमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा; महाराष्ट्र सरकारने द्यावे स्पष्टीकरण, उच्च न्यायालयाचा आदेश)
दरम्यान, लोकल प्रवासासाठी पोलिसांकडून डिजिटल पास दिले जाणार आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व स्थानकांवर ये-जा करणाऱ्यांची थर्मल स्कॅनींगद्वारे तपासणी केली जाईल. स्थानक परिसरामध्ये येणारे व जाणारे मार्ग निश्चित केले जाणार आहेत. तसेच रेल्वे स्थानकाच्या 150 मीटर परिसरामध्ये फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे.