पुणेकर महिलांची 'पगार पे पॅड' चळवळ, घरकामासाठी येणाऱ्या महिलेला देणार मोफत सॅनिटरी पॅड
सॅनिटरी पॅड्स ( फोटो सौजन्य- फेसबुक )

पुणे: मासिक पाळी किंवा पिरेडस बद्दल चारचौघात उघडपणे बोलल्यास आजही अनेकांच्या भुवया उंचावतात, हा निषिद्ध विषय सर्वांच्या निदर्शनात आणण्यासाठी पुणेकर महिलांनी ही एक अनोखी शक्कल लढवली आहे. अलीकडेच पार पडलेल्या मासिक पाळी जनजागृती दिनाचे औचित्य साधून पूला पुणे लेडीज (Pula Pune Ladies)  या सोशल मीडियावरील ग्रुपने पगार पे पॅड (Pagar Pe Pad) या उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत आपल्या घरी घरकामासाठी येणाऱ्या महिलांना त्यांच्या महिन्याच्या पगारासोबत एक सॅनिटरी नॅपकिन्सचे पाकीट मोफत देण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाची सुरवात नुकतीच झाली असली तरी पुणेकर महिलांनी याला समाधानकारक प्रतिसाद दिला आहे. शहरी भागात ही कल्पना पुरेशी विस्तारल्यास ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचण्यासाठी देखील इच्छुक असल्याचे पुणे लेडीज ग्रुपच्या प्रमुख सोनिया कोंजेटी यांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावरून समाजकार्य करणारे अनेक ग्रुप्स आज अगदी जागतिक स्तरावर देखील कार्यरत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे पूला पुणे लेडीज. मागील चार वर्षांपासून तब्बल 62 हजार सदस्यांचा हा ग्रुप सोशल मीडियावरून महिलांसाठी काम करत आहेत. यामध्ये जनजागृतीच्या कामासोबतच शिक्षण, नोकरी, व्यवसाय, घरगुती व्यापार या गोष्टींना चालना देण्याचा प्रयत्न केला जातो.सोशल मीडिया हे सकारत्मक बदल घडवून आण्यासाठी अचूक माध्यम आहे त्यामुळे पगार पे पॅड ही संकल्पना अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या माध्यमाचा पर्याय निवडल्याचे सोनिया कोंजेटी यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. फनी वादळानंतर ओडिशात पुनर्वसन प्रकल्पाला सुरवात,पुरी येथील घरांना पुढील दोन महिन्यात सॅनिटरी नॅपकिन मिळणार मोफत

मासिक पाळीच्या दिवसात सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करणं आजही अनेक महिला टाळतात. अनेकांना तर त्याचा वापर,फायदे याविषयी काहीच माहिती नसते. पगार पे पॅडच्या निमित्ताने आपल्या घरी मदतनीस म्हणून येणाऱ्या महिलेला प्रत्येक महिन्याच्या पगारासोबत एक पॅडचे पाकीट मोफत दिले जावे तसेच त्याबरोबरीने सॅनिटरी नॅपकिन्स म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा, वापर झाल्यावर पॅड नष्ट कसे करावे याविषयी माहिती दिली जावी असे पुणे लेडीज ग्रुपतर्फे आवाहन करण्यात आले आहे. एक पॅडचे पाकीट बाजारात किमान 30 रुपयांपासून उपलब्ध आहे मात्र यातून तुम्ही कोणाचेतरी प्राण वाचवू शकता असा भावनिक संदेश देखील पुणे लेडीजच्या सोनिया यांनी दिला.