Pune Ganeshotsav 2022: यंदा मोठ्या थाटामाटात साजरा होणार गणेशोत्सव; CM Eknath Shinde यांच्याकडून अनेक निर्बंधांमध्ये सूट
Lord Ganesha | (Photo Credits: Pixabay)

कोरोनाच्या सावटानंतर तब्बल 2 वर्षानंतर देशात अनेक सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे होत आहेत. आता महाराष्ट्रात उत्सुकता लागलेली आहे ती बाप्पांच्या आगमनाची. अनेक निर्बंध शिथिल झाल्याने यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवात मंडळांना चार दिवसांऐवजी पाच दिवस लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्याची घोषणा केली आहे. साधारणत: गणपती उत्सवात मंडळांना चार दिवस लाऊडस्पीकर वापरण्याची मुभा असते, मात्र आता मंडळे पाच दिवस लाऊडस्पीकर वापरू शकतील. मुख्यमंत्री काल पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

याशिवाय 10 दिवसांची उत्सव मंडळे आहे त्याच ठिकाणी राहिल्यास त्यांना त्या ठिकाणी पाच वर्षांसाठी मंडळ उभारण्याची परवानगी द्यावी, असे आदेश शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले. सध्याच्या नियमांनुसार, पुणे महानगरपालिकेसारख्या स्थानिक प्राधिकरणांनी आतापर्यंत केवळ मंडळांना वार्षिक आधारावर मंडळ उभारण्याची परवानगी दिली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत मंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यानंतर त्यांनी मंडळ उभारण्याची वैधता आता 5 वर्षांसाठी राहणार असल्याचे सांगितले.

मात्र, 5 वर्षांपर्यंत परवानगी मिळवण्यासाठी मंडळांना दरवर्षी त्याच ठिकाणी मंडळ उभारावा लागेल, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. यावेळी सर्व सण मोठ्या थाटात साजरे करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. संबंधित अधिकारी आणि पोलीस  विभागाला निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंडळांना रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेवटचे पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. (हेही वाचा: CM Eknath Shinde आणि Devendra Fadnavis या दोन सदस्यीय सरकारचा मोठा विक्रम; 30 जून रोजी शपथ घेतल्यापासून जारी केले तब्बल 749 शासकीय ठराव)

याशिवाय मंडळांना वीज मिळण्यासाठी वीज मीटर देण्यासंदर्भातील अडचणींकडेही लक्ष दिले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विभागांना कायमस्वरूपी मीटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना आपण पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.