Pune Crime: पुण्यातील पाषाण भागातील पेट क्लिनीकमध्ये लसीकरणासाठी आणलेल्या एका कुत्र्याचा फास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दोन पशुवैद्यकीय तज्ज्ञांसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाषाण भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी कुत्र्याच्या मालकीनने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.डॉ.संजीव राजाध्यक्ष, डॉ.शुभम राजपूतसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेकडे लॅब्राडोर कुत्रा होता. त्याचे नाव हनी असे होते. वार्षिक लसीकरणासाठी आणि नखे कापडण्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी पाषाण येथील विगल्स माय पेट या क्लिनिकमध्ये मालिकन कुत्र्याला घेऊन आली. तिने कुत्र्याला लसीकरणासाठी, तसेच नखे कापण्यासाठी पशुवैद्याकडे नेले. डॉ.राजपूत आणि दोन मदतनीसांनी कुत्र्याला पट्टे घालून झाडाला बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी कुत्र्याला बांधण्यासाठी वापरण्यात येणारा पट्टा अडकला. फास घट्ट झाल्याने कुत्रा कोसळला. त्यानंतर कुत्र्यावर उपचार सुरू करण्यात आले. पंधरा मिनिटांनी कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर डॉक्टर राजपूत आणि डॉक्टर राजाध्यक्ष न सांगता फरार झाले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला अशी तक्रार महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दोन डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल केला.या संदर्भात चतु:शृंगी पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहे.