Pune Crime: कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या, चारित्र्याच्या संशयावरुन पतीचे कृत्य; पुणे येथील घटना
Murder (file image)

पुणे परिसरातील (Pune Crime)वाढती गुन्हेगारी ही सध्या पुणे पोलिसांची (Pune Police) डोकेदुखी ठरत आहे. पुण्यातील वारजे येथील कर्वेनगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन 25 वर्षीय पत्नीची डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेने परिसरात आता खळबळ उडाली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. (हेही वाचा -Pune Crime: पुण्यात दारूच्या नशेत इमारतीच्या गच्चीवरून ढकलून मित्राची हत्या, आरोपीला अटक)

पूजा लखन कांबळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. लखन बालाजी कांबळे असं अटक केलेल्या आरोपी पतीने नाव आहे.लखन हा पत्नी पूजावर सतत चारित्र्यावरुन संशय घेत असे. घरात या विषयावरुन त्यांच्यात सतत खडके उडत असत. मंगळवारी सकाळी देखील याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. मात्र या भांडणानंतर रागाच्या भरात लखनने पुजाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे पूजाचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेनंतर आरोपी लखनने घटनास्थळावरुन पळ काढला आणि आपल्या मुळ गावी पोहचला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीचा शोध सुरु केला. आरोपी लखनला पोलिसांना यवतच्या दिशेने जात असताना अटक केली.